Cast: मातंग / Matang Village: / Taluka: ताजगाव / Tajgaon District: सांगली / Sangli Gender: F | वयः ७० मुलगे २ मुलीः ३ विधवा व्यवसाय ः शेती आहे या आता बरीच वर्षे कवलापूर या सांगली जवळील गावात रहातात. त्यांचे मूळ गाव आरवडे. या गावी त्यांचा अपमान झाला. एक दिवस त्या संडासला गेल्या होत्या शेतात. परत येताना समोरून पाटलाचा मुलगा आला. त्यावरून गावाने सभा बसवली. त्या सभेत सासर्याने विचारले की तुम्ही एकमेकाशी काय बोललात. त्यांनी देवावरचे फूल उचलून सांगीतले की माझे पाच भाऊ तसा हा सहावा भाऊ. पण मी याच्याशी काही बोलले नाही. त्याने पण सांगीतले की तो यांच्याशी काही बोलला नाही. तरी यांना गाव सोडावे लागले. त्याकाळी प्रवासाची साधने नव्हती. पायी प्रवास केला. सामान डोक्यावरून वाहून आणले. त्या कवलापूरला आल्या. तिथे काही दिवस बहीणी शेजारी राहील्या. मग तिथेच झोपडी टाकून राहील्या. त्याच गावात शेजार्या पाजार्यांशी मायाममता जोडली. गाव अपमानीत अवस्थेत सोडावे लागले ही गोष्ट त्यांच्या मनाला फार लागून रहीली आहे. यांच्या बहीणीचा मुलगा ख्रिश्चन झाला आहे. यांची पण मुले ख्रिश्चन झाली आहेत. यांच्या एका मुलाला यांच्या मुलीची मुलगी दिली आहे. यांना जात्यावरली गाणी, पाळणे, उखाणे, अभंग हे सर्व येते. पाठांतर आहे. आवाज चांगला आहे. बारशाला, लग्नाची हळद दळायला लोक यांना आग्रहाने घेऊन जातात. त्या म्हणाल्या की मी हळद दळायला जायची इतर कार्यक्रमांना जायची तर तिथेच ही गाणी शिकले. यांचे यजमान कवलापूरला रस्त्यात अपघात होऊन वारले ते दुःख यांच्या मनात आहे. आजही त्या जिथे यजमानांना अपघात झाला त्या रस्त्याने जात नाहीत. पायवाटेने जातात. त्यांना त्याना त्यांच्या यजमानांचे नाव विचारल्यावर म्हणाल्या की कशाला नाव सांगू गेलेल्या माणसाचे व त्यानी स्वतः रचलेली एक ओवीच सांगीतली चैताच्या महीन्यात झाडाला नाही राहील पान राजा हावशा पाखरान माझ उदास केल मन आरवडे गावात अपमान झाला म्हणून त्या गावाला कधी गेल्याच नव्हत्या. आता त्यांची चुलत जाऊ वारली तिच्या दिवसाला आग्रहानी गोताने नेले म्हणून गेल्या. त्यांची जी शेतजमीन आहे त्यात आता द्राक्षे लावतात. त्यांना गोत म्हणाले की तुझा भाकरीचा हिस्सा आहे गावात. त्यांनी आग्रह केला की गावात रहा. पण या म्हणाल्या की माझे मुलगे आहेत तिथेच मी रहाणार. त्या परत कवलापूरला आल्या. यांची गाणी व मुलाखत १६.१२.२००२ ला कवलापूरला घेतली. | ||