Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: करमाळा / Karmala District: सोलापूर / Solapur Gender: F | वयः७० मुलगे ः ३ मुली ः२ सवाष्ण घरची परिस्थितीःदोन मुलांना रेल्वेत नोकरी आहे. धाकटा बिगारी काम करतो. त्याची बायको बंगल्यात स्वैपाकाची कामे करते. या रक्षेबाई मूळच्या करमाळा तालुक्यातील. आता त्या पुण्यात ताडीवाला रोड झोपडपट्टीत रहातात. करमाळा सोडले त्याला ३०-३५ वर्ष झाली. दुष्काळामुळे स्थलांतर केले.त्यानंतर त्या विदर्भात अकोल्याला होत्या. तिथे यांचे यजमान गिरणीत कामाला होते. तिथून मग पुण्याला आल्या. या आता धाकट्याकडे रहातात. पूर्वी या भाजी विकण्याचे काम करायच्या. मध्यंतरी अपघात झाला त्यामुळे आता पाटी डोक्यावर घेऊन जाववत नाही. त्यामुळे घरीच असतात. त्यांच्या घरी देवीचा फोटो आहे. त्या देवीची पूजा करतात व मंगळवार, शुक्रवारचा उपास करतात. त्यांना बाबासाहेबांचा अभिमान आहे. त्या परत परत सांगत होत्या की बाबासाहेबांनी घाण कामातून सुटका केली. त्यांना गोष्टी सांगण्याचा छंद आहे असे वाटले. कथा सांगावी असे त्या सांगीत होत्या की, 'बाबासाहेबांनी गावकीची कामे बंद करायला सांगीतली. त्यातून सुटका केली. हे त्यांनी मोठेच काम केले. ब्राहृणाच्या दारात जात नाही. पाटलाच्या दारात जात नाही. आम्ही आमच्या घरात अभिमानाने जगतो'.त्यांचे म्हणणे की, 'बाबासाहेबांनी घाणीचे काम करत होतो त्यातून सुटका केली. हे त्यांचे आमच्यावर उपकारच झाले. पण देव नाही असे म्हणतात ते मला पटत नाही. देव आहे. तो जन्म दोतो, घडवतो व मृत्यु दोतो. तेंव्हा देव नाही असे कसे समजायचे. जे आज सांगतात भाषणात देवाचे करू नका ते पण घरी देवाची पूजा करतात. बाहेर एक बोलतात व घरात एक करतात '. त्यांच्या सुनेची आई पाहुणी आली होती. त्यापण करमाळा तालुक्यातच रहातात. अजुनही त्या गावाकडे रहातात. त्या गुरवारचा उपास करतात. रक्षेबाईंची सून म्हणाली की माझी आई वा माझ्या सासुबाई उपास करतात, पूजा करतात पण आम्ही तरूण मंडळी हे देवाचे करत नाही. रक्षेबाईंना गाण्यांचा पण छंद आहे. गाणी त्या म्हणतात. एक बाबासाहेबांवरील गाणे त्यांनी म्हणून दाखवले. अर्थात त्यात काव्यगुण फार नाहीत. पण ते गाणे त्यांनी गळ्यावर म्हटले. 'पुण्यामधी ग मॅट्रिक झाला मग बडोद्याला गेला सयाजी मास्तर होत्या त्याला बाबा बॅलीस्टर झाला सरकारी वकील झाला मग पुण्यामधी आला फाशीचा हुकुम गांधा महाराजाला सरकारी वकील नाही त्याला बाबाला टाईम झाला मग बाबा गेला येरवड्याला का बाबा तुम्हाला उशीर झाला गांधी बाबाला फाशी होती नऊ वाजता बाबासाहेब बोलू लागला फाशीचा टाईम होऊनी गेला गांधी मग बुटसकट पाया पडू लागला मग गांधी बोलू लागला काय भीमा पाहीजे तुजला भीम बोलला काही नको मजला तुझ्या दारात नाही यायचो मग तिथून निघाला मग भीमा कोरेगावला गेला तिथे जाऊन विचार केला' त्यांना बरीच जात्यावरली गाणी येतात. त्यांनी सीतेची गोष्ट सांगितली व काही ओव्यापण सांगितल्या. काही ओव्या भावावर, शेतावर असे पण सांगितले. त्या म्हणाल्या की, अकोल्याला होतो तेंव्हा नणंद विहारात जाऊ द्यायची नाही. विहारात दोन बहीण भावंडे आली होती नागपूरहून. त्यांचे गाणे ऐकले. ते लक्षात आहे. त्यांनी ते गाणे म्हणून दाखवले. धनी कुंकवाला तो करून दिला काय सांगू बाई तो मवाल्या निघाला काय सांगू आई सुख नाही मला सकाळी उठूनी करावे शेणपाणी तिथून जावे मजुरीला बश्या बैल म्हणावयाची लाज नाही त्याला नंदेबाई नवे लुगडे खण नाही खण नाही धड मला मला जुन पराण घरामधी कधी मी रूसले नाही पाया पडून सांगते सासूबाई भलत सलत मला बोलायाच नाही आम्ही रक्षेबाईंकडे बसलो होतो तेंव्हा बोलणे चालू होते की त्या झोपडपट्टीत जी थोडी रिकामी जागा आहे तिथे मशीद बांधावी असे त्या झोपडपट्टीत रहाणार्या मुसलमान मंडळींना वाटते आहे. पण दलितांना ते पसंत नाही. काही दलीतांचे म्हणणे आहे की उगाच भांडणे होतील. तिथे आता विहार बांधण्याचा विचार चालू आहे. वस्तुतः त्या जागेपासून ५० फूट अंतरावर एक विहार ३-४ वर्षापूर्वीच बांधला आहे. लोकांचे म्हणणे की त्या विहारात कोणी जाऊन बसत नाही. वाचनालय आहे त्याचा उपयोग करत नाही. वंदना करत नाहीत. तिथेच एक जवळच रहाणारी बाई आली होती ती म्हणाली की तिच्या माहेरी मुंबईला मुले वंदना शिकली व पाली भाषेत सुध्दा वंदना करतात. इथे मुले असा कोणताच अभ्यास करत नाहीत. मग नवा विहार बांधून तरी काय करणार? त्यांच्या बोलण्यावरून दिसते की विहार बांधणे वा मशीद बांधणे ही राजकीय पक्षांची खेळी आहे. यांच्याकडे आम्ही १३.१२.२००२ ला ताडीवाला रोड झोपडपट्टीत गेलो होतो | ||