Cast: मराठा / Maratha Village: माजगाव / Majgaon Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: मुळशी / Mulshi Gender: F | वयः५५ शिक्षणः नाही मुलगा ः१ व्यवसायः शेती ५ ते ६ एकर भात पिकाची जमीन. सध्या १.५ खंडी भात पिकतो. कोकणात यांच्या माहेरी कोणी जात्यावरील गाणी म्हणत नाही. या बाई माजगावला येऊनच गाणी शिकल्या. डोंगर उतारावर १२.५ एकर वरकस जमीन होती. ती १०/११ वर्षांपूर्वी विकली. जमिनीचे एजंट साधारणपणे त्यावेळेपासून या भागात यावयास लागले. पुढे या भागातीलच काही मंडळी जमीन एजंटाचे काम करु लागली.या बाईंना एक दीर आहे. तो लोणावळ्याला रहातो. त्याचे तेथे दुकान आहे. त्या दिराला लोणावळ्यात प्लॉट घ्यायचा होता. त्याने शेत विकले. या बाईंच्या नवर्यास २५००० रुपये दिले. गावात बर्याच लोकांनी अशा प्रकारे जमिनी विकून मोठी घरे बांधली आहेत. जंगलातील लाकूड फुकट मिळते त्यामुळे लाकडाचा भरपूर उपयोग केला आहे. या बाईंचे हे दुसरे लग्न. यांचे माहेर रायगड तालुक्यातील पालीच्या शेजारचे. प्रथम लग्न भोसले नावाच्या माणसाशी झाले होते. तो मावळ तालक्यातील कुसगावचा. कुसगावला यांची मावशी दिली होती. यांच्या नवर्याला मुंबईत कापड गिरणीत नोकरी होती. यांना त्या नवर्यापासून दोन मुले झाली. मुलगा तीन वर्षाचा व मुलगी तीन महिन्याची होती त्यावेळेस यांचा नवरा दुसर्या बाईला घेऊन पळून गेला. मग छोटी मुलगी मेली. त्यानंतर सात वर्ष या भावाकडे राहिल्या. भावाची गरीबी होती. भाऊ भावजय नीट वागत नव्हती. यांना पुढे देवळात जाऊन निजण्याची पाळी आली. मग थोरल्या मेहुण्याने सांगितले की दुसरे लग्न कर. मग या खोंडग्यांशी लग्न केले. या खोंडगेंचे पहिले लग्न झाले होते. त्यांना एक मुलगी होती. मुलगा हवा म्हणून यांच्यांशी लग्न केले. यांना खोंडगेंपासून मूल झालेच नाही. खोंडगे हे आपल्या मामाच्या वतनावर अंबवणे येथे रहात. या सवतींचे पटले नाही. मग खोंडगे यांना घेऊन माजगावला आपल्या जमिनीवर आल्या. सवतीच्या मुलीचे लग्न करुन दिले. ती बारप्यात रहाते. तिची आई तिच्या जवळ रहाते. मामांची जमीन खोंडग्यांनी मुलीला दिली आहे. घरची परिस्थितीः यांच्या नवर्याने मोठे घर बांधले आहे.आता त्यांनी घरातच छोटे दुकान घातले आहे. यांचा मुलगा ठाण्याला असतो. तो तेथे छोटे कॅन्टीन चालवतो. त्याला तीन मुले आहेत. दोन मुलगे व एक मुलगी. | ||