Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: वाशी / Vashi District: उस्मानाबाद / Usmanabad Gender: F | वयः ७२ मुलगे ः ४ मुलीः २ गाणी आईकडुन शिकले. घरची परिस्थितीः यांच्या यजमानांना रेल्वेत नोकरी होती. त्यामुळे लग्न झाल्यावर त्या मुंबईला गेल्या. तिथे त्यांना तीन मुलगे व दोन मुली झाल्या मग पुण्याला बदली झाली. इथे धाकटा मुलगा झाला. नवरा वारला त्याला २३ वर्षे झाली. मुले तशी लहान होती. डोक्यावर भाजी विकून मुले वाढवली. दोन मुलींची व चार मुलांची लग्ने केली. आता चारही मुलगे पुण्यातच रेल्वेत नोकरीला आहेत. एक जावई पुण्यात रेल्वेत नोकरीला आहे व एक उस्मानाबाद जिल्ह्यात उमरग्याला असतो. मुलगे दारू पितात. त्यामुळे जिवाला तसदी लागते. एकाला भावाचीच मुलगी केली होती पण तिने भांडणापाई जाळून घेतले. सुनापण काम करतात. एकूण दारूमुळे परिस्थिती ताणाची होते. जिवाला चैन पडत नाही. तिथे शेजारी रहाणारे एक मराठ्याचे कुटुंब आहे. तेथील माणूस पण दारू पिऊन वारला. त्याने ह्या बाईंना मावशी मानले होते. त्याबाई सुध्दा यांना चांगले विचारतात.या म्हणाल्या की माझी आई एकदा का जात्यावर बसली की इतकी गाणी म्हणायची की स्वर्गातून देवानेच खाली उतरावे ऐकावाया वाटायाचे आईचा आवाज गोड होता. या आईकडूनच गाणे म्हणायला शिकल्या. यांचा आवाज अतिशय गोड आहे व सुरात गाणे म्हणतात. त्यांना गवळणी, जात्यावरला गाणी येतात. त्यांनी बाबासाहेबांची व इतर विषयांवरली सीता, दृष्ट, भाऊ, शेती, गाणी सांगितली. त्यांनी ओवी सांगितली बंधुला जेवण द्राक्षाच्या लाह्या हौशा बंधुला निरस दुदु हात धुवाया त्यांची शेजारीण म्हणाली की, 'अशी गाणी म्हटली की इथली मुल मुली हसतात. आता इथे कधी सणाला फेर धरला तरी सर्वजण हसतातच. जुन काही नको. सारख टि.व्ही. पुढ बसून सिनेमे बघायचे'. शेवटी त्यांना आठवले की, 'माझ्या मालकांनला जात्यावरल्या दळणाच्या पिठाच्या भाकरीची लई आठवण व्हायाची. मी बी गाणे गाऊन दळायची आन् चुलीवर भाकरी करायची. आता काय मालक बी गेले, जातबी फुटल आन् सगळच संपल. आता कवा तरी आज म्हटली तशी जात्यावरली गाणी म्हणते'. विधवा यांना आम्ही १३.१२.२००२ ला ताडीवाला रोड झोपडपट्टीत भेटलो. | ||