Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: जळगाव जाणुर / Jalgaon Janur District: बुलढाणा / Buldhana Gender: F | वयः५५ मुलगेः २ मुलगीः १ सवाष्ण व्यवसाय ः शेती ५ एकर. गहु, मिरची, कापूस,ज्वारी, तुर ही पिके घेतात. विहीर बागायत. एका मुलाला डी.एड् केलय. नोकरी मिळण्यसाठी दीडलाख रुपये मागतात. ते कुठुन देणार. त्यांनी अगदी जोरात सांगितले की आम्ही बौध्द आहोत. त्यांचे यशोधरा महीला मंडळ आहे. त्या म्हणाल्या की प्रथम आम्ही रोजच विहारात बसायचो. सगळे शिकून घेतले. याचा अर्थ असावा की वंदना करायला व इतर बाबी शिकून घेतल्या. आता १५/२० दिवसांनी एकदा बसतात. त्यांच्या सोबत त्यांची बहीण अनिता रायपुरे आली होती. ती त्यांची जाऊ पण लागते. त्यांच्या सोबत त्यांच्या शेतावर काम करणारी नर्मदा खामणकर ही चांभारबाई पण होती. त्या तिला आपली सूनच समजतात. सून हा त्यांच्या साठी अधुनिक शब्द. त्यांचा शब्द वायरी आहे. ती जेंव्हा ओवी सांगू लागली की दुरून दिसे पंढरी पसार्याची/ रूखमीण भरी चुडा हिरवी माडी कासाराची त्या वेळा या म्हणाल्या की आम्ही म्हणतो की दिल्ली दिसे पसार्याची/ रमा भरती चुडा हिरवी माडी कासाराची. त्यांनी ओवी दिली आहे दिल्ली दिल्ली करता दिल्ली दिसते पसार्याची/रमाबाई भरी चुडा वर हिरवी माडी कासाराची. त्या पुढे म्हणाल्या की आम्ही तुमच्या पंढरीच्या, सीतेच्या ओव्या म्हणतो मग तू आमच्या आंबेडकरांच्या ओव्या का म्हणत नाही. पण त्यांचे एकूण संबंध चांगले होते. अनुसुया तावडे या यांच्या पुतणीच्या सासू. ती सर्व मंडळी नात्या गोत्यातील होती. एकत्र जमून नागपूरला आली होती. मला (हेमा राईरकर) त्यांनी जात विचारली. मी ब्राहृण म्हणून सांगितले. त्या म्हणाल्या की आम्ही ब्राह्मणावर ओव्या सांगितल्या त्यात तुमच्या जातीला नाव ठेवलीत. तुम्हाला राग आला का. मी त्यांना समजावून सांगितले की ब्राहृण जातीने चुका केल्यात. त्या बद्दल नाराजी दाखवली तर का राग यावा. मला आंबेडकरांच्या कार्याबद्दल आदर आहे, म्हणूनच मी दिक्षा भूमीला आले. मग त्यांना ते पटले. त्यांना पुष्कळच ओव्या येत होत्या. त्या देण्याची खूषी होती. त्या आपल्या बरोबरीच्या बायांना सांगत होत्या की ती बाई एवढे श्रम करून लिहून घेतीय तर काय बिघडल आपल तिला सांगायला. त्यांनी परत परत सांगितले की पुढच्या वर्षी नक्की भेटुया म्हणून. त्यांच्या सोबत जी पुरूष मंडळी होती ती पण आनंदाने तिथे बसली होती. त्यांनी त्यांचा पत्ता लिहून दिला. त्यांच्या गावाला आग्रहाचे निमंत्रण दिले. यांच्या ओव्या व मुलाखत आम्ही नागपूर येथे २५.१०.२००१ ला दिक्षा भूमीवर घेतली. | ||